भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या सचिन मोरे यांना भारतीय सैन्याने वाहिली श्रद्धांजली
तसंच संपूर्ण सैन्याकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
भारत-चीन सीमेवर (India- China Border) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) कर्तव्य बजावताना नाईक डिएसव्ही सचिन मोरे (Naik DSV Sachin More) या जवानाला वीरमरण आले. गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चीन मध्ये सुरु असणारा संघर्ष लक्षात घेता एका नदीवर पुलाच्या उभारणीचे काम सैन्याच्या एका तुकडीवर सोपवण्यात आले होते. त्यातील दोन जवान नदीच्या प्रवाहात पडल्यामुळे सचिन मोरे यांनी त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतील आणि दगड डोक्याला लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानासाठी भारतीय सैन्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सचिन मोरे हे महाराष्ट्राच्या (Maharashtra) नाशिकचे (Nashik) जिल्ह्यातील रहिवाशी होते. काल (26 जून) संध्याकाळी त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर (Pune Airport) आणण्यात आले. (गलवान खोऱ्यात मालेगाव चे जवान सचिन मोरे शहीद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी वाहिली श्रद्धांजली)
पुणे विमानतळावर सचिन मोरे यांचे पार्थिव दक्षिण महाराष्ट्र (Dakshin Maharashtra) मुख्यालयाच्या आणि गोवा सब-एरया (Goa Sub-Area) च्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले. तसंच त्यावेळी त्यांना संपूर्ण सैन्य सन्मान देण्यात आला. लष्कर कमांडर आणि दक्षिण कमांडच्या सर्व विभागांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. लेहच्या प्रतिकूल वातावरणात नदीवर पूल बांधण्यासाठी सचिन मोरे यांनी दिलेल्या बलिदानासाठी इतर सैन्य दलाकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहीद सचिन मोरे हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी गावचे रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भावंडे, पत्नी आणि दोन मुलींसह एक सहा महिन्याचा चिमुकला असे कुटुंब आहे. आज (27 जून) सचिन यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर सैन्य सन्मानात अंतिम संस्कार करण्यात येतील.