Antila Bomb Scare Case: सचिन वाझे विरोधात NIA कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय आहे कलम

ही कलमे अत्यंत धोकादायक आहे. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे. याअंतर्गत दोषी आढळल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा किमान 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाते

Sachin Vaze (Photo Credits: Facebook)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात अटक केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एनआयएने (NIA) वाझे यांच्यावर असा गुम्हा दाखल केला आहे की, त्यांचे सुटकेचे सर्व मार्ग जवळजवळ बंद झाले आहेत. एनआयएने सचिन वाझे यांच्यावर UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादी कारवाया थांबविणे हे या कायद्याचे मुख्य काम आहे. या कायद्यानुसार पोलीस असे दहशतवादी, गुन्हेगार किंवा इतर लोकांची ओळख पटवतात, जे दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे किंवा अशा कामांसाठी लोकांना तयार करतात किंवा अशा कारवायांना प्रोत्साहित करतात.

यूएपीए अंतर्गत सचिन वाझे यांना जास्तीत जास्त 30 दिवसांची पोलिस कोठडी मिळू शकते. आरोपपत्र दाखल करण्यासाठी तपास यंत्रणेला 90 दिवसांची मुदत मिळू शकते. एनआयएने विशेष एनआयए कोर्टाला सांगितले की, मनसुख हिरेन हत्येचा खटलाही यासोबत जोडलेला आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी. तसेच, ठाणे सत्र कोर्टाने एटीएसला मनसुख हिरेन खून प्रकरणाची चौकशी थांबवावी आणि सर्व कागदपत्रे एनआयएकडे सुपूर्त करावी असे सांगितले आहे. याबाबत एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता हा तपास हातात येताच एनआयएने सचिन वाझे यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांच्यावर यूएपीए कायदा लावला आहे.

(हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीला दिला नकार; मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सल्ला)

एनआयएने सचिन वाझे यांच्यावर युएपीएचा कलम 16 आणि 18 लागू केला आहे, ज्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही कलमे अत्यंत धोकादायक आहे. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे. याअंतर्गत दोषी आढळल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा किमान 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणली जाऊ शकते. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला केवळ संशयास्पद असल्याचे समजून दहशतवादी घोषित केले जाऊ शकते.