Anil Parab Viral Video: अनिल परब यांचा 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल, नारायण राणे यांच्या अटकेशी जोडला जातोय संबंध
या व्हिडिओचा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना झालेल्या अटकेशी संबंध जोडला जातो आहे. हा व्हिडिओ रत्नागिरीचे पालकमंत्री असणाऱ्या अनिल परब यांच्या मंगळवारच्या (24 ऑगस्ट) पत्रकार परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे वाहतूक मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओचा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना झालेल्या अटकेशी संबंध जोडला जातो आहे. हा व्हिडिओ रत्नागिरीचे पालकमंत्री असणाऱ्या अनिल परब यांच्या मंगळवारच्या (24 ऑगस्ट) पत्रकार परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या व्हिडिओनंतर नारायण राणे यांच्या अटकेपाठिमागे अनिल परब हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परब यांच्या कथीत व्हिडिओबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही वक्तव्य केले आहे.
दावा केला जात आहे की, फोन आल्यानंतर अनिल परब यांनी सुरु असलेली पत्रकार परिषद थांबवली. परंतू, तिथे असलेल्या माईकमुळे परब यांचे बोलणे रेकॉर्ड झाले. या पत्रकार परिषदेत परब यांना दोन वेळा फोन आला. पहिला फोन त्यांना आला होता. तर दुसरा फोन त्यांनी केला होता. या फोन कॉलदरम्यान अनिल परब आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यात बोलणे झाल्याचा दावा केला जात आहे. (हेही वाचा, Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा; सामना संपादकीयातून जोरदार हल्लाबोल)
अनिल परब फोनवर काय बोलले?
हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन (अर्ज) नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा.”
दरम्यान, याच व्हिडिओत अनिल परब हे शेजारीच बसलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना राणेंच्या अटकेबाबत माहिती देताना दिसतात. परब सांगतात की, 'राणेंना अद्याप ताब्यात घेतले गेले नाही. राणे पोलिसांचा पहारा असलेल्या घरात बसलेले आहेत. जेव्हा पोलीस आतामध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली आहे. पोलीस आता त्यांना बाहेर आणतील'.
अनिल परब व्हायरल व्हिडिओ
दरम्यान, पत्रकारांनी अनिल परब यांना नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता 'मी तर इथे तुमच्या समोर आहे. त्यामुळे मला त्याबाबत पूर्ण माहिती नाही. त्यामुळे सध्या तरी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही' असे परब म्हणताना दिसतात.