Anil Deshmukh meets Sharad Pawar: महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा, दिल्लीत बैठक; अनिल देशमुख यांनी का घेतली शरद पवार यांची भेट?
अनिल देशमुख हे पवार यांच्या भेटीला गेल्याचे वृत्त येताच महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली.
गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्ली येथे भेट घेतली. अनिल देशमुख हे पवार यांच्या भेटीला गेल्याचे वृत्त येताच महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राजीनाम्याबाबतच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. तसेच, पवार यांच्यासोबत झालेली चर्चा ही विदर्भातील मिहान प्रकल्पाबाबत होती असे त्यांनी सांगितले. राजीनाम्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनिल देशमुख यांची देहबोली आणि मौन बरेच बोलके होते. मात्र, त्यांनी स्पष्टपणे काहीच सांगितले नाही.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, आमच्या विदर्भामध्ये महान प्रकल्प होतो आहे. या प्रकल्पात काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या येऊ पाहात आहेत. त्या कंपन्या इथे याव्यात आणि इथल्या नागरिकांचा फायदा व्हावा. याबाबत माहिती देण्यासाठी आणि त्यांची मदत घेण्यासाठी मी दिल्लीला आलो होतो असे अनिल देशमुख म्हणाले. (हेही वाचा, Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकासआघाडीत बिघाडी?)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाबाबतही शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. या प्रकरणात अलिकडे झालेल्या काही अपडेट्सबाबतही त्यांनी माहिती घेतली असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या कामगिरीबाबत शरद पवार नाराज असल्याचे वृत्त आहे त्याबाबत विचारले असता अनिल देशमुख यांनी मौन बाळगले.
गेल्या काही काळापासून गृहमंत्रालयाची कामगिरी तसेच सचिन वाझे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे समजते. या नाराजीतूनच अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार लटकत असल्याची चर्चा आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला तर हे पद ग्रामविकासमंत्री जयंत पाटील किंवा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.