खुशखबर! राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मानधनाच्या पन्नास टक्के पेन्शन; पंकजा मुंडे यांचा मोठा निर्णय
त्यानंतर या शिष्ट मंडळाची महत्वाची बैठक महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासोबत पार पडली.यामध्ये मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन म्हणून देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अंगणवाडी (Anganwadi) सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाचा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. काल (मंगळवारी) याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली एका मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर या शिष्ट मंडळाची महत्वाची बैठक महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासोबत पार पडली यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन म्हणून देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
याआधी केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2018 पासून जाहीर केलेली मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही. शिवाय 1 एप्रिल 2019 पासून मानधनातही पाच टक्के वाढ दिलेली नाही. अशा सर्व मागण्यांसाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. सरकारने अंगणवाडी सेविकांना दीड हजार रूपये, मदतनीसांना 750 रूपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना 1250 रूपये मानधन वाढ जाहीर केली होती. (हेही वाचा: कलेक्टरची मुलगी शिक्षणासाठी अंगणवाडी शाळेत; हायफाय स्कूलचा हट्ट धरणाऱ्या पालकांना धडा)
दरम्यान पेन्शनबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. या नोकरीत मिळणारे मानधन मुख्यत्वे त्यांच्या कुटुंबावर खर्च होत आहे. त्यामुळे निवृतीनंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी ही पेन्शन आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना मानधनाच्या पन्नास टक्के पेंशन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या आणि मागण्यांबाबत शासन नेहमी सकारात्मक होते आणि यापुढेही सकारात्मक राहील’ पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोनवेळा मानधनवाढ देऊन त्याची अंमलबजावणी झाली होती.