Anant Geete on Shiv Sena Rebel: शिवसेना बंडखोरांच्या गळ्यात पट्टा,साखळी भाजपाच्या हातात, अनंत गीते यांचे टिकास्त्र; उद्धव ठाकरे यांनाही सल्ला
गेलेत त्यांना परत बोलवण्याच्या विचारही करु नका, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी शिवसेना बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे
शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे. त्याची साखळी मात्र भाजपच्या हातात आहे. हे लोक बंडखोर नाहीत. हे लोक बेईमान आहेत. हे सर्वजण जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेले आहेत. त्यामळे त्यांच्या या कृत्यामुळे नुकसान जनतेचे होणार आहे. माझे तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आता सांगणे आहे की, जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करु. गेलेत त्यांना परत बोलवण्याच्या विचारही करु नका, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी शिवसेना बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. ते रत्नागिरीत येथील शिवसेना मेळाव्यात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरी नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनावर जोरदार भर दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका सुरु आहे. या बैठकांना शिवसेनेच्या अनेक आजी माजी नेत्यांकडून, पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडूनही प्रतिसाद मिळतो आहे.
अनंत गीते यांनी म्हटले की, मी आता उद्धव ठाकरे यांनाही सांगणार आहे. जे गेले आहेत त्यांना जाऊ द्या. त्यांना परत बोलावण्याचा विचारही करु नका. जे गेले आहेत. त्यांना मातीत गाडू आणि शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभा करु. जे बंडखोर झाले आहेत त्यांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साकळी मात्र भाजपच्याच हातात आहे. (हेही वाचा, Shivsena: खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी, भविष्यात शिंदेंशी आणि भाजपशी जुळवून घ्या)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपण इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाच्या गळ्याला नख लावण्याचे काम आपण मुद्दामहून करु नका. हे सांगण्याचे पूरेपूर धाडस माझ्यात आहे. तुम्हाला कळत नाही तुम्ही कोणत्या प्रकारचे पाप करता आहात. याचे भविष्यात काय परिणाम होतील. शिवसेना केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर अखंड हिंदुस्तानची गरज असल्याचेही गीते या वेळी म्हणाले.