Anandacha Shidha: दिवाळीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; संचात मैदा, पोह्याचादेखील समावेश, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय
हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल.
आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. यंदा दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत मिळणाऱ्या आनंदाचा शिधामध्ये मैदा, पोह्याचादेखील समावेश केला गेला आहे. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्य तेल असे 4 जिन्नस होते. मात्र, आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.
यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्य तेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
यासह, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. क्यूएस वर्ल्ड रँकिंगमधील 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी पी.एचडी अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती राहील. याकरिता 10 कोटी 80 लाख इतक्या खर्चासदेखील मंजुरी देण्यात आली. (हेही वाचा: Varsha Gaikwad On Nanded Hospital Tragedy: राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा; नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी वर्षा गायकवाड यांची मागणी)
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी यासाठी एकूण 10 शिष्यवृत्ती, तर औषधी व जीवशास्त्र, लिबरल आर्ट व ह्युमॅनिटीजसाठी प्रत्येकी 6, शेतकीसाठी 3 आणि कायदा व वाणिज्यसाठी 2 अशा या 27 शिष्यवृत्ती राहतील.