Ola Cab Driver Arrested: अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी ओला कॅब चालकाला मुंबईतील गोरेगाव येथून अटक

प्रवासादरम्यान ओला कॅब (Ola Cab) चालकाने मुलीचा विनयभंग केला तसेच तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले अशी तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती.

Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ओला कॅब (Ola Cab) बुक करुन प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा कथीत विनयभंग (Molesting) केले प्रकरणी चालकास अटक करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान ओला कॅब (Ola Cab) चालकाने मुलीचा विनयभंग केला तसेच तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले अशी तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथून अटक केली. पीडिता ही 15 वर्षांची आहे. या प्रकरणात आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती, पीएसआय सचिन पांचाळ यांनी दिली आहे.

मुंबई येथील एक अल्पवयीन मुलगी भोपाळ येथून विमानाने मुंबईला आली. ती आरे येथील हायप्रोफाईल कॉलनित राहते. विमानतळावर उतरताच तिने घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली. त्यानुसार ओला कॅब आली. त्यात बसून मुलीचा प्रवास सुरु झाला. प्रवास करत ती आरे कॉलनी येथील आपल्या निश्चित ठिकाणी आली. यावेळी कॅबचे भाडे देण्यासाठी तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. या वेळी घरुन सुट्टे पैसे आणते असे ती चालकाला म्हणाली. दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यातून टॅक्सी चालक मुरारी सिंह याने पैशांच्या बदल्यात मुलीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्याच्या मागणीला मुलीने नकार दिला. त्यानंतर टॅक्सी चालक मुरारी तेथून निघून गेला. (हेही वाचा, Mumbai: अल्पवयीन मुलीचा रेल्वेत विनयभंग करणाऱ्या सहप्रवाशाला अटक )

ट्विट

दरम्यान, घडलेली सर्व हकीकत पिडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी पीडितेला घेऊन पोलिसांत तक्रार दिली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हणले आहे की, प्रवासादरम्यान आरोपी सातत्याने तित्याकडे अश्लील नजरेने पाहात होता. तसेच, आपल्याशी फ्रेंडशिप करशीला का? अशी विचारणाही तो तिच्याकडे सातत्याने करत होता, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले.