Lockdown In Amravati: अमरावतीकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट

राज्यातील महानगरे आणि प्रत्येक जिल्ह्यातील चित्र आता जळपास एकसारखेच दिसू लागले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) थैमानामुळे दररोज हजारो लोकांना संसर्ग होत असून, आरोग्य व्यवस्थेवर असह्य ताण पडू लागला आहे. राज्यातील महानगरे आणि प्रत्येक जिल्ह्यातील चित्र आता जळपास एकसारखेच दिसू लागले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात 15 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. एकीकडे अजूनही लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. तर, लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करून अमरावतीकरांनी (Amravati) कोरोनाची भयावह लाट आता परतावून लावल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत अमरावतीतील रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात अव्वल होती. त्यानंतर जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. याआधी जिल्ह्यात दररोज 900 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ही रुग्णसंख्या 300 हून कमी झाली आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला राजकारणाचे डोस देणं थांबवून राज्याची जबाबदारी घ्यावी- पीयुष गोयल

महाराष्ट्रात काल तब्बल 63 हजार 729 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर, तब्बल 398 मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 लाख 3 हजार 584 वर पोहचली आहे. यापैकी 30 लाख 4 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 59 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 34 रुग्ण सक्रिय आहेत.