अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी मोदी सरकारच्या अत्याचाराविरोधात भूमिका मांडावी अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे बंद पाडू; नाना पटोले यांचा इशारा
पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे. मात्र तरी देखील शांत असणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या दरांनी तर शंभरी गाठली आहे. मात्र तरी देखील शांत असणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवरुन आक्रमक भूमिका घेणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आता शांत का? असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी विचारला आहे. तर मोदी सरकारच्या देशाविषयी धोरणात या कलाकारांनी भूमिका न मांडल्यास महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. परंतु, मनमोहन सिंह सरकारच्या काळात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे ते आता शांत का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसंच मनमोहन सिंह सरकार काळात ज्या लोकशाही मार्गाने ट्विट करत होते. त्यापद्धतीने मोदी सरकार विरोधाताही भूमिका मांडावी अन्यथा त्यांचे सिनेमे महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोले ट्विट:
देशात लोकशाही आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता अत्याचार करणं बंद करावं. मुठभर उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी देशांचं सरकार चालवण्याची किमया भाजपने सुरु केली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. तसंच जनतेची लूट करणं मोदी सरकारने तातडीने थांबवावं, असंही ते म्हणाले.