Eknath Shinde On Raj Thackeray: अमित ठाकरे जिंकण्याची शक्यता कमी, अचानक मतदारसंघही बदलला; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
अमित ठाकरे यांची उमेदवारी आणि सदार सरवणकर यांची भूमिका यावरुन एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघ आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची उमेदवारी यांवरुन मुंख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांचे चिरंजीव हे भांडूप विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही आमची आखणी तशी केली होती. मात्र, नंतर त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तिथे आमचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) उमेदवार आहेत. स्थानिक समिकरणे विचारात थेट लढत झाल्यास अमित जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे सरवणकर यांचे म्हणने होते. ते म्हणने सांगण्यासाठी गेलेल्या सरवणकर यांची भेटही राज यांनी नाकारली, या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त जाले आहे.
माहिममध्ये काट्याची टक्कर
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटाकडून महेश सावंत रिंगणात आहेत. त्यातच आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा वेळी काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे. पण, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असताना तिथे शिंदे यांचा उमेदवार उभा राहणे हे काहीसे राजकीय दृष्ट्या चर्चात्मक ठरले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections: माहीम येथे MNS ला कडवे आव्हान; Sada Sarvankar यांचा निवडणुकीच्या मैदानातून मागे न हटण्याचा निर्णय)
एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत गौप्यस्फोट केले आहेत. आम्ही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत. उदा. शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावरकर उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार नाही. अमित ठाकरे यांच्याबद्दलही मतदारसंघ सांगताना आम्हाला तो भांडूप असल्याचे सांगितले होते. आम्ही सर्व आखणी त्यादृष्टीने केले. पण, त्यांची उमेदवारी थेट जाहीर झाली ती सुद्धा माहीम येथून. तेथे काही स्थानिक समिकरणे आहेत. जी पाहता महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यात थेट लढत झाली तर त्यांच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे सदा सरवणकर यांचे म्हणने होते. त्याउलट तिरंगी लढत झाली तर आम्हा दोघांपैकी एकाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे, असे त्यांना वाटत होते. मी हाच विचार जाऊन राज ठाकरे यांना सांगण्यास सांगितले. पण, त्यांनी भेटच टाळली, असे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेतून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता आहे.