American Model Murder Case: 19 वर्षे जुन्या हत्याकांड प्रकरणातील वाँटेड व्यक्तीला पकडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक Prague ला रवाना
पोलीस बराच काळ पटेलच्या मागावर होते. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती
अमेरिकन मॉडेल (American Model) हत्याकांडातील वाँटेड आरोपीच्या अटकेसाठी आणि प्रत्यार्पणासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक झेक प्रजासत्ताकातील प्राग (Prague) येथे गेले आहे. विपुल पटेल या व्यक्तीवर या मॉडेलच्या हत्येत त्याच्या मित्राला मदत केल्याचा आरोप आहे. या मॉडेलच्या दहा लाख डॉलर्स (सुमारे 75 कोटी रुपये) विम्याची रक्कम हडपण्याची त्यांची योजना होती. फेब्रुवारी 2003 मध्ये मॉडेलची हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रणेश देसाईला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.
अमेरिकन नागरिक प्रणेश देसाई आणि त्याचा मित्र विपुल पटेल यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पटेल सध्या प्रागमध्ये आहे. या खटल्यातील त्याच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या अपीलवर सुनावणीसाठी तो हजर न राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट जारी केले. अमेरिकन मॉडेल लिओना स्विंडरस्की हिच्या हत्येप्रकरणी ठाण्यातील सत्र न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाई आणि स्विंडरस्की यांचे प्रेमसंबंध होते. हे दोघेही मे 2003 मध्ये लग्न करणार होते. दोघे 7 फेब्रुवारी 2003 रोजी मुंबईतील विमानतळावर पोहोचले, परंतु त्यानंतर लगेचच मॉडेल बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह ठाण्यातील काशिमीरा परिसरात महामार्गावर आढळून आला. या मॉडेलच्या 1 मिलियन डॉलरच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी देसाईने आपला मित्र विपुल पटेल याच्या मदतीने तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
आरोपानुसार, विमानतळावरून कॅबमध्ये चढल्यानंतर पटेलने मॉडेलला मारण्यासाठी दोन व्यक्तींना सुपारी दिली. हत्येनंतर तिचा मृतदेह महामार्गावर फेकून दिला. अधिकाऱ्याने सांगितले की, देसाईला या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली होती. पोलीस बराच काळ पटेलच्या मागावर होते. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. या हत्येच्या तपासासंदर्भात आता महाराष्ट्रातील ठाण्यातील पोलिसांचे पथक पटेलच्या प्रत्यार्पणासाठी प्रागला गेले आहे. (हेही वाचा: भोसरीत 27 वर्षीय तरुणाने मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर केला बलात्कार; आरोपीला अटक)
परराष्ट्र मंत्रालय आणि इंटरपोल यांच्या समन्वयाने पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखालील पथक शनिवारी प्रागला रवाना झाले, असे काशिमीरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. या आठवड्यात ते परतण्याची शक्यता आहे.