Ambenali Ghat Rock-Slide: आंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक तात्पूरती बंद
दरड हटविण्याचे काम सुरु आहे. दरड हटली की पुन्हा या ठिकाणी वाहतूक पूर्ववत सुरु होणार आहे.
Raigad Policel: मान्सूनला महाराष्ट्रात आता चांगलाच सूर गवसला आहे. परिणामी मान्सून दमदार बरसत आहे. मुंबई शहर, उपनगरं आणि ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई सह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा जवळपास सर्वच विभागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कालपासून राज्यभर पाऊस संततधार बरसतो आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढते आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यात पोलादपूर येथेही दरड कोसळल्याने आंबेनळी घाट (Ambenali Ghat Rock-Slide) वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. दरड हटली की पुन्हा या ठिकाणी वाहतूक पूर्ववत सुरु होणार आहे.
आंबेनळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, असे असले तरी घाबरण्याचे कारण नाही. दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेत कोणत्याही प्रकारीच जीवित हानी झाली नाही. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, नागरिक आणि प्रवाशांना वाहतूक आणि प्रवासासाठी या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलादपूर येथे आंबेनळी गाटात असलेल्या कालिकामाता पॉइंडजवळ असलेली दरड कोसळली. काल रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आणि पुन्हा आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अशी दोन वेळा दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. आंबेनळी घाटातून प्रामुख्याने महाबळेश्वरकडे जाता येते. त्यामुळे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा काहीसा खोळंबा झाला आहे. दरम्यान, दरड कोसळल्याने रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. (हेही वाचा, Mumbai Rains: मालाड मध्ये झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू; मागील 24 तासांत 26 ठिकाणी उन्मळून पडले वृक्ष)
ट्विट
पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई चौपाटी, रायगड, पालघर आणि उर्वरीत ठिकाणीही पाऊस जोरदार कोसळतो आहे. दरम्यान, स्थानिक तहसीलदारांनी प्रवाशांना अवाहन केले आहे की, त्यांनी आंबेनळी घाटाऐवजी ताम्हिणी घाटातून पुण्याला जाण्याचा मार्ग निवडावा. आवश्यकता नसल्यास व तातडीचे काम असल्याशिवाय उगाचच आंबेनळी घाटातून प्रवास करु नये.