MNS vs Amazon: अॅमेझॉनवर लवकरच दाखल होणार मराठी भाषेचा पर्याय; मनसे नेते अखिल चित्रे यांची ट्विटद्वारे माहिती

त्यानंतर आता अॅमेझॉनने वेबसाईटवर मराठी भाषेचा वापर करण्याची तयारी दर्शवली आहे.

MNS vs Amazon (Photo Credits: Wikimedia Commons)

अॅमेझॉनवर (Amazon) मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रह धरणाऱ्या मनसेने (MNS) गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नोटीस बजावल्यानंतर मनसैनिकांनी मुंबई (Mumbai), पुण्यातील (Pune) अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर आता अॅमेझॉनने वेबसाईटवर मराठी भाषेचा वापर करण्याची तयारी दर्शवली आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी संदर्भातील माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. अॅमेझॉनने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय त्यांनी धडाकेबाज महाराष्ट्र सैनिकांना दिले आहे.

अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ॲमेझाॅन वर काही वेळातच मराठीची घोषणा.. श्रेय सर्व धडाकेबाज महाराष्ट्र सैनिकांचे.. अभिनंदन" (MNS vs Amazon: पुणे, मुंबई मधील अॅमेझॉन कार्यालयात मनसैनिकांची तोडफोड; मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक)

अखिल चित्रे ट्विट:

काय आहे नेमका अॅमेझॉन-मनसे वाद?

अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, अशी मनसेची मागणी होती. या मागणीची दखल अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी घेतली होती. तसंच मराठीच्या वापराबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांनी मेल द्वारे मनसेला कळवलं होतं. यासाठी अ‍ॅमेझॉनचं एक शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. मात्र त्यानंतर यासंदर्भात कोणतीही प्रगती झाली नाही. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आणि अॅमेझॉन विरोधात 'नो मराठी, नो अॅमेझॉन' मोहिमेला सुरुवात केली. तसंच मनसे नते अखिल चित्रे यांनी ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’लिहिलेली पोस्टर्स मुंबईभर लावली.

दरम्यान, या प्रकरणी अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे यांना नोटीस बजावली आणि 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. यावरुन हा वाद अधिकच पेटला आणि त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं उत्तर दिलंय हे इतिहासात पाहिलं असेल भविष्यातही पाहायला मिळेल, असा इशारा मनसेने ट्विटद्वारे दिला. काल मुंबई, पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. त्यानंतर आज अॅमेझॉनने अखेर माघार घेत मराठी भाषेचा समावेश करुन घेण्यास संमती दर्शवली आहे.

दरम्यान, अॅमेझॉनची मस्ती उतरवणार असा इशारा चित्रेंनी दिला होता. त्यामुळे आता मनसेच्या आक्रमक पवित्र्यापुढे अॅमेझॉन झुकल्याने मनसे नेते अखिल चित्रे यांनी आनंद व्यक्त करत मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे.