राज्यातील सर्व व्यायाम शाळेची तपासणी होणार; जिम मधून तरूणांना उत्तेजक द्रव्य देत असल्याची माहिती समोर

यामुळे राज्यातील सर्व व्यायाम शाळेची चौकशी होणार, अशी घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी विधानसभेत केली आहे.

राज्यातील अनेक व्यायाम शाळेत (Gym) तरुणांना बॉडी बनवण्यासाठी जिममधून उत्तेजक द्रव्य (Stimulant) देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील सर्व व्यायाम शाळेची चौकशी होणार, अशी घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी विधानसभेत केली आहे. शिवाय ऑनलाईन विक्री थांबविण्यासाठी राज्य सरकारचा स्वतंत्र कायदा आणता येईल का? हे तपासून एकाच तज्ञ समितीचे गठण करून अहवाल मागविला जाईल,अशीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे. राज्यातील काही व्यायाम शाळेत तरुणांना हानिकार असलेले स्टिरॉइड आणि उत्तेजक द्रव्य दिले जात आहे. यामुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असून येत्या सहा महिन्याच्या आत राज्यातील सर्व व्यायाम शाळेची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

विधानसभेत आमदार अमित साटम यांच्यासह आमदार तामील सेल्वन यांनी व्यायाम शाळेचा मुद्दा मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील काही व्यायाम शाळेत तरुणांना बॉडी बनवण्यासाठी काही उत्तेजक द्रव्य घेण्यास सांगितले जात आहे. तसेच लवकर बॉडी बनवण्याच्या कमी वेळात अनेकजण उत्तेजक द्रव्याचे सेवन करतात. याचा परिणाम त्यांच्या शरिरावर पडतो. मुंबईतील मुंब्रा आणि कल्याण येथे गेल्या आठवड्यात कमी वेळात बॉडी बनवण्यासाठी व्यायाम शाळेतून घेतलेले उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याने दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. महत्वाचे म्हणजे, उत्तेजक द्रव्य हे ऑनलाईन अथवा व्यायाम शाळेत विकले जातात. मात्र, व्यायाम शाळेकडे कुठल्याही प्रकारचे विक्री परावाना नाही. त्यामुळे अशा औषधावर प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ राज्य सरकारने कायदा आणावा, असेही मागणी आमदार अमित साठम यांनी केली आहे. यावर मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अशा प्रकारची औषध बंदी करण्यासाठी आणि ऑनलाईन विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदा करत असून यात काही उणिवा आढळल्यास राज्य सरकार स्वतंत्र कायदा करण्याचा निश्चित विचार करेल, असे त्यांनी जाहीर केले. हे देखील वाचा- माजलगाव नगरपालिकेत 5 कोटींचा आर्थिक घोटाळा; भाजपचे नगराध्यक्ष सहाल चाऊससह दोन मुख्यधिकाऱ्यांना अटक, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी

दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांचे एक पथक तयार करून पुढील सहा महिन्यात राज्यातील सर्व व्यायाम शाळेची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्यातील ज्या व्यायाम शाळेत उत्तेजक द्रव्य आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.