मुंबई मधील सर्व कोविड केंद्र आठवड्याभरात सुरु होणार; कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर BMC चा महत्त्वपूर्ण निर्णय

आठवडाभरात ही केंद्र सुरु करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

BMC's COVID Facility (Photo Credits: Twitter)

राज्यासह मुंबईतील (Mumbai) कोविड-19 (Covid-19) रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरातील सर्व कोविड केंद्रे (Covid Centres) सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आठवडाभरात ही केंद्र सुरु करण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्येत घट झाल्याने बहुतांश कोविड केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोविड केंद्रांसोबतच जम्बो केंद्र देखील अनिश्चित कालावधीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.

कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याने अनेक कोविड केंद्र बंद करुन प्रत्येक विभागात एक असे एकूण 24 कोविड केंद्र 31 मार्च 2021 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार होती. तसंच सात जम्बो कोविड केंद्रही सुरु राहणार होती. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे आठवड्याभरात सर्व केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. (Coronavirus: आता दोन शिफ्ट्समध्ये चालणार मंत्रालयातील कामकाज, वर्क फ्रॉम होमचीही सोय; नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश)

कोविड केंद्रांमध्ये तब्बल 70 हजार 518 बेड्स असून त्यापैकी 13 हजार 136 बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर 9757 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याने 30 टक्के बेड्स रुग्णांनी व्यापले गेले आहेत. त्यामुळेच पालिकेचा हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

त्याचबरोबर आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, औषधोपचार यांचे देखील नियोजन केले जात आहे. कोरोना बाधित रुग्णांचे अहवाल 24 तासांच्या आत पालिकेला कळविणे आणि याबाबतची माहिती संकेतस्थळावर तात्काळ अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. याचे नियोजन तातडीने होण्यासाठी 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना संबंधित आदेश देण्यात आले आहेत.