लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते; अजित पवार यांचं गोपीचंद पडळकर यांना प्रत्यूत्तर
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर आज साताऱ्यांतील पत्रकार परिषदेत निशाणा साधला आहे.
लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना प्रत्यूत्तर दिलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर आज साताऱ्यांतील पत्रकार परिषदेत निशाणा साधला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, 'लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा असा प्रयत्न केला जातो. बोलणाऱ्यांनी स्वत:ची पात्रता पाहावी आणि त्यानंतरचं बोलावं. बोलणाऱ्याला जनतेनी जागा दाखवली आहे. एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं, यावरून तुम्ही ओळखू शकता, त्यांच्या विधानाला किती महत्व द्यायचं, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. (हेही वाचा - शरद पवार यांचे गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर, 'इतक्यांंदा डिपॉझिट जप्त केलेल्यांची दखल का घ्यावी' म्हणत लगावला टोला)
शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असो ते गप्प बसत नाहीत, ते सदैव काम करत असतात. संकट काळात या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. मात्र, तरीदेखील लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. लोकांनी गोपीचंद पडळकरांसारख्या पात्रता नसलेल्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं आहे. परंतु, लोकचं त्यांना जागा दाखवतील. प्रत्येकाने लायकी पाहून बोलावे. शब्द जपून वापरावे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला, अशा जहरी शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती.