चंद्रकांत पाटील यांची विकेट? Ajit Pawar लवकरच पुण्याचे पालकमंत्री- सूत्र
इतर पालकमंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
Guardian Minister District Distribution: राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्याचा अंक अद्यापही संपला नाही. सत्तास्थापना, मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटप झाले असले तरी अजूनही सत्ताविस्तार बाकीच आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पालकमंत्री आणि त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्यांची खांदेपालट होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट नव्यानेच सत्तेत आल्याने पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये फेरबदल होणार आहेत. खास करुन पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत जोरदार उत्सुकता असून विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची विकेट पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पाटील यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत शिरकाव केल्यानंतर अजित पवार यांनाच पुण्याचे पालकमंत्री करा अशी मागणी जोरदार होत होती. त्यामुळे लवकरच ही मागणी पूर्ण केली जाणार असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला खरोखच असा बदल झाला तर मात्र विद्यमान मंत्री आणि पुण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जाईल. तसेही चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद असतानाही कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला. त्यामुळे एकेकाळी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल पक्षात नाराजी आहेच. त्यामुळे अशी चालून आलेली संधी पक्ष सोडणार नसल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांना ताकद म्हणजे भाजपला फटका
पुणे जिल्हा पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे द्यायचे म्हणजे भाजपसाठी ती धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण ते सध्या पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्या गटापेक्षा आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पालकमंत्री पद मिळाल्यास ते आपली आगोदरच असलेली ताकद पुन्हा आणखी विस्तारतील. परिणामी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे काय व्हायचे ते होईल. परंतू, भाजपची ताकद मात्र आकसली जाईल. ज्याचा फटका पक्षाला बसू शकेल, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.
पालकमंत्री खांदेपालटानंतर होणारा संभाव्य बदल
दरम्यान, नव्या खांदेपालटानुसार भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम, नाशिकसाठी छगन भुजबळ, बिड जिल्ह्यासाठी धनंजय मुंडे, तर कोल्हापूरसाठी हसन मुश्रीफ यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.