Ajit Pawar Faction Moves Bombay HC: अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव; शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला दिले आव्हान

मंगळवारी पाटील यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

Ajit Pawar Faction Moves Bombay HC: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP), शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाचे चीफ व्हिप अनिल पाटील यांनी त्यांचे वकील श्रीरंग वर्मा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सभापती राहुल नार्वेकर यांच्या शरद पवार गटाच्या आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका फेटाळण्याच्या आदेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

याआधी 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच 'खरा राजकीय पक्ष' असल्याचे जाहीर केले. मात्र, प्रतिस्पर्धी गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास सभापतींनी नकार दिला. पक्ष दोन गटात विभागल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर सभापतींनी आपला निकाल दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली शरद पवार यांनी केली होती. मात्र जुलै 2023 मध्ये, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभ्या फूट पडली. आता सभापतींचा आदेश चुकीचा असल्याचे सांगत अजित पवार गटाने शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी पाटील यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी ठेवले आहे. (हेही वाचा: Legal Challenge Over Maratha Reservation: मराठा आरक्षणाला कायदेशीर आव्हान; महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)

वकील वर्मा म्हणाले की, सभापतींनी चुकीचा निष्कर्ष काढला की पक्षातील फूट हा पक्षांतर्गत मतभेद आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हाच ‘खरा राजकीय पक्ष’ असल्याचा निर्णय एकदा सभापतींनी दिला, तर अपात्रतेच्या याचिकांनाही परवानगी द्यायला हवी होती. दरम्यान, निवडणूक आयोगानेही नुकताच अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देत, त्यांना राष्ट्रवादीचे 'घड्याळ' चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. अयोगोच्या या आदेशाला आव्हान देणारी शरद पवार यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.