NCP Political Crisis: 'त्या' तिघांना वगळून बाकीच्यांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी

या शिवाय लोकसभेतील श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचेही सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Sharad pawar and Ajit pawar (Photo credit- FB)

Sharad Pawar Group vs Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) काका विरुद्ध पुतण्या संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) गटाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये शरद पवार गटातील काही खासदारांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मजेशीर असे की, यात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव नाही. शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार (Ajit Pawar Group) गटातील प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार गटाने हे पाऊल उचलले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (Shiv Sena) पक्षाप्रमाणेच घडामोड घडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळावर दावा ठोकला आहे. प्रकरण केंद्रीय निवडणुक आयोगाकडे प्रलंबीत आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवडणुक आयोग काय निर्णय देतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सुनावणी दरम्यान, पवार विरुद्ध पवार अशा परस्परविरोधी गटाच्या वकिलांमार्फत जोरदार युक्तीवाद पाहायला मिळत आहेत.

राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांच्याकडे दिलेल्या पत्रामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची नावे नाहीत. अर्थात सुळे आणि कोल्हे हे लोकसभेवरील खासदार आहेत. पण असे असले तरी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मतदारांच्या सहानुभुतीचा फायदा मिळू नये यासाठी अजित पवार गाटने खेळी केल्याचे बोलले जात आहे.

पत्रात नावे कोणाची?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने दिलेल्या पत्रामध्ये खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांची नावे आहेत. या शिवाय लोकसभेतील श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचेही सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार गट एका मर्यादेतच ही लढाई लढू इच्छितो की कायअसा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्येही निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ही लढाई नेमकी कोणते स्वरुप घेणार याबाबत अद्याप तरी कोणालाही अंदाज बांधता येत नाही. शिवसेना पक्षात जे घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडू पाहते आहे. त्यामुळे शिवसेना पक्षातील घडामोडी अद्यापरी नियम, कायदा आणि कोर्ट याच कक्षेत अडकल्या आहेत. अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत कोणीही आल्याचे सध्यातरी चित्र नाही.