Ajit Pawar On Jalna Lathi Charge: सरकारने जालना मध्ये लाठीचार्जचे आदेश दिल्याचं सिद्ध केल्यास राजकारणापासून दूर होईन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विरोधकांना आव्हान

त्यांच्यासोबत महादेव जानकर होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही जरांगेंची भेट घेऊन चौकशी केली आहे.

CM and DCM | Twitter

जालना (Jalna) मध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnge Patil)  उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी मराठा समाजातील काही बांधवांवर लाठीचार्ज, गोळीबार करण्यात आला. यामुळे हा मराठा आरक्षणाच मुद्दा पुन्हा तापला आहे. आंदोलकांसोबतच पोलिसही यामध्ये जखमी झाले आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. 'वरून' आदेश आल्याशिवाय हा लाठीचार्ज होऊ शकत नाही असं विरोधकांनी म्हणत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आज यावर बोलताना अजित पवारांनीही विरोधकांना आव्हान दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालेली घटना चूकीची होती असं म्हणत विरोधकांचाही समाचार घेतला आहे. 'सध्या या लाठीचार्ज प्रकरणी पोलिस महासंचालक तपास करत आहेत त्यांच्या अहवालातून पुढील माहिती समोर येईल परंतू सरकारने लाठीचार्जचे आदेश दिले हे सिद्ध करून दाखवा आम्ही तिघही राजकारणापासून दूर होऊ असं आव्हान दिले आहे. आमच्यावरील आरोप सिद्ध करू न शकल्यास विरोधकांमधून ते राजकारणापासून दूर होणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. तर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जमधील जखमी मराठा समाजातील लोकांची माफी मागत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मराठवाड्यातील मराठा समाजाला निजाम काळात लागू असलेले आरक्षण हवे आहे. सध्या कुणबी समाजाला त्याबाबत प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी मागील 7 दिवसांपासून मनोज जरांगे उपोषणाला बसले आहे. सरकारने अपेक्षित न्याय न केल्यास जरांगे यांनीही उद्या (5 सप्टेंबर) पासून पाणी देखील न पिण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आपण मराठा समाजाच्या बाजूने आहोत आणि चर्चेमधून हा प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांच्यासह शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

आज जरांगे यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर पोहचले होते. त्यांच्यासोबत महादेव जानकर होते. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही जरांगेंची भेट घेऊन चौकशी केली आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा निघत असल्यास तो काढला जाईल म्हटलं आहे. पण अशा गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी जीवाची बाजी नको असंही ते म्हणाले आहेत.