अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु; मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही आश्वासन, जाणून घ्या काय आहे मागणी (Photo)
शिवसंग्राम पक्षाच्या (Shiv Sangram Party) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद यांनी
अहमदनगर: अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी एक अभिनेत्री म्हणून जसा आपला ठसा उमटवला, तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या जनसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. शिवसंग्राम पक्षाच्या (Shiv Sangram Party) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद यांनी साकळाई पाणी योजनेसाठी लढा (Sakhalai Water Issue) सुरु केला आहे. ही योजना मंजूर न झाल्यास आपण आमरण उपोषणाला बसू असा इशारा सय्यद यांनी दिला होता. त्यानुसार आज (9 ऑगस्ट) पासून त्यांचे आमरण उपोषण सुरु झाले आहे. शेकडो ग्रामस्थ यामध्ये त्यांच्यासोबत सामील झाले आहेत.
साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. या साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न चालू आहेत. ही योजना मंजूर झाली नाही तर क्रांती दिना दिवसापासून आपण उपोषण सुरु करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात हे आमरण उपोषण सुरु झाले आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुका येतील तरी हे आश्वासन पूर्ण झाले नाही. आता पुन्हा एकदा दिपाली सय्यद यांनी गेले दीड महिना गावोगावी फिरून ग्रामस्थांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यातून आपल्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला.