Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 लोकांचा मृत्यू; मुंबईतील अनेक क्रू मेंबर्सचा समावेश- Reports

उड्डाणानंतर अवघ्या 32 सेकंदांत, विमानाने 625 फूट उंची गाठली आणि मेडे कॉल जारी केला, परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान मेघानीनगर येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासस्थानावर कोसळले, ज्यामुळे प्रचंड स्फोट आणि आग लागली.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 16 लोकांचा मृत्यू; मुंबईतील अनेक क्रू मेंबर्सचा समावेश- Reports
Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून, लंडनला निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाची 12 जून 2025 रोजी झालेली दुर्घटना (Ahmedabad Plane Crash), ही भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात भयंकर शोकांतिका ठरली आहे. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यापैकी फक्त एक जण वाचला. अहवालानुसार या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील 16 व्यक्तींचा समावेश आहे, ज्यापैकी बहुतांश क्रू मेंबर्स होते. ही माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, पीडितांच्या कुटुंबांना मदत आणि आधार देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या दुर्घटनेने हवाई सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

अहवालानुसार, 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचे फ्लाइट AI171 अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघाले. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते, ज्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. उड्डाणानंतर अवघ्या 32 सेकंदांत, विमानाने 625 फूट उंची गाठली आणि मेडे कॉल जारी केला, परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान मेघानीनगर येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासस्थानावर कोसळले, ज्यामुळे प्रचंड स्फोट आणि आग लागली.

या दुर्घटनेत विमान पूर्णपणे नष्ट झाले, आणि जमिनीवरही 8 जण ठार झाले, ज्यामध्ये 4 वैद्यकीय विद्यार्थी आणि त्यांचे 4 नातेवाईक यांचा समावेश आहे. एकमात्र वाचलेला प्रवासी, विश्‍वासकुमार रमेश, हा ब्रिटिश-भारतीय वंशाचा आहे आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. अहवालानुसार, विमानाचा पायलट कॅप्टन सुमित पुष्कराज सभरवाल हा मुंबईतील पवई परिसरातील जल वायु विहारचा रहिवासी होता आणि तो त्याच्या वृद्ध पालकांसोबत राहत होता.

विमानाचे सह-वैमानिक क्लाईव्ह कुंदर हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवासी होते, असे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळते. केबिन क्रू मेंबर दीपक पाठक शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहत होता. पाठकच्या बहिणीने आधी सांगितले होते की, लंडनला जाण्यापूर्वी तो त्याच्या आईशी बोलला होता. तो 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होता, असेही तिने सांगितले. दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचाही अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. यासह विमान दुर्घटनेमध्ये श्रद्धा धवन हिचाही मृत्यू झाला आहे. श्रद्धा ही एअर इंडिया मध्ये सीनियर ग्रुप मेंबर होती.

दुसरी क्रू मेंबर, मैथिली पाटील, नवी मुंबईतील न्हावा गावची रहिवासी होती. पाटील दोन वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये रुजू झाली आणि तिचे वडील, मोरेश्वर पाटील, ओएनजीसीमध्ये कामगार कंत्राटदार आहेत. अपर्णा महाडिक, ही आणखी एक क्रू मेंबर, पश्चिम उपनगरातील गोरेगावची रहिवासी होती आणि तिचा पती देखील एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून काम करतो. ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची नातेवाईक होती. रोशनी राजेंद्र सोनघरे आणि सायनीता चक्रवर्ती या दोन्ही क्रू सदस्य अनुक्रमे डोंबिवली आणि जुहू येथील आहेत. (हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने मुंबई, दिल्ली, गुजरात आणि लंडन विमानतळांवर सुरु केली पीडितांच्या नातेवाईकांसाठी मदत केंद्रे)

मृतांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील हातिड गावातील रहिवासी महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशा यांचाही समावेश होता. पवार कुटुंब 15 वर्षांपूर्वी सांगोला सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले होते आणि ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. या अपघातात यशा कामदार मोधा ही नागपूर येथील व्यापारी मनीष कामदार यांची मुलगी होती. ती तिचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षाबेन यांच्यासोबत लंडनला जात होती आणि तिघांचाही अपघातात मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).