Aarakshan Bachao Elgar Sabha: OBC सभेच्या पार्श्वभूमीवर जालना मध्ये जमावबंदीचे आदेश

आजच्या सभेला गोपिचंद पडळकर, पंकजा मुंडे, महादेव जानकर, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हजर राहण्याची शक्यता आहे.

Curfew | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

जालना (Jalna) मध्ये आज संपूर्ण जिल्ह्यासाठी जमावाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून 30 नोव्हेंबर दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले आहे. जालना मध्ये आधी मराठा आरक्षणावरून आणि आता अंबड येथे ओबीसी समाजाकडून सभा आयोजित केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. दरम्यान हा आदेश शासकीय कर्तव्य पार पाडणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना लागू नसेल.

मराठा आरक्षणासाठी समाज एकवटलेला असताना हे आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून त्यांना दिलं जाऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाची आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास नकार दिला आहे. आज त्यासाठी 100 एकर ग्राऊंड वर सभेचं आयोजन करण्यात आले आहे. महा एल्गार सभा आयोजित केली असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे पथकही सभास्थळी असणार आहे. आजच्या सभेला गोपिचंद पडळकर, पंकजा मुंडे, महादेव जानकर, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हजर राहण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांनी ओबीसी सभेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,'लोकशाही पद्धतीने सभा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे कोणी सभा घेतल्यास आमचा आक्षेप नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीला सर्वसामान्य ओबीसींचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे.'