पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ कुटुंबीयांनाही कोरोना विषाणूची लागण; आतापर्यंत 8 जणांचे रिपोर्ट्स सकारात्मक
यामध्ये नुकतेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांचे नाव जोडले गेले आहे
सध्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण इतके वाढले आहे की, आता या लढ्यात सामील झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नुकतेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांचे नाव जोडले गेले आहे. मोहोळ यांनी काल ट्वीटच्या माध्यमातून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र आता मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना सामान्य लक्षणे आहेत. दरम्यान कुटुंबातील एकूण 17 जणांची कोरोना चाचणी झाली होती आता उर्वरीत सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.
काल मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले होते की, ‘थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना व्हायरस टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.’ त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी केली असतान, त्यातील 8 लोकांचा अहवाल सकारात्मक आला आहे. पुण्यात आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत. (हेही वाचा: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह, प्रकृती स्थिर असल्याची ट्वीटच्या माध्यमातून दिली माहिती)
पुण्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून महापौर मुरलीधर मोहोळ यांची तारेवरची कसरत चालू आहे. लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, रुग्णांवरील उपचार याबाबत सरकारच्या व पालिकेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी गेल्या 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ ते प्रयत्नशील राहिले आहेत. दरम्यान, नुकतेच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत ते हजर होते. आता या बैठकीला उपस्थित असणाऱ्या मंडळींची काळजी वाढली आहे. यासह हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली.