आदित्य ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक? 'हा' मतदारसंघ निश्चित होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री पदासाठीही नाव चर्चेत

याबाबत शिवसेनचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे

आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख ( Photo Credit: twitter )

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि शेवसेना (Shivsena) यांच्या युतीला घवघवीत यश हाती आले. आता तयारी सुरु झाली आहे ती विधानसभा निवडणुकांची (Vidhan sabha Election). विधानसभा निवडणुकाही भाजप आणि शिवसेना एकत्र लढवणार आहेत. आतापर्यंत ठाकरे घराण्यात कोणीच निवडणूक लढवली नाही, मात्र यावेळी पहिल्यांना शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेनचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपली मागणी समोर ठेवली आहे. 'हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य - विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय', असा उल्लेख करत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.

आज संध्याकाळी 5 वाजता मातोश्रीवर एक बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार यावर चर्चा होणार आहे. जर शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री पद आले तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. याचसोबत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार का याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. युवासेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंसाठी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ निश्चित करण्यात आला होता. (हेही वाचा: मंत्रीपद तोंडावर असताना जनतेने दिला डच्चू; दिग्गजांच्या पराभवानंतर शिवसेना शोधणार नवे चेहरे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान)

यापूर्वी अनेकवेळा आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात होती. मागच्यावेळी त्यांच्यासाठी मतदारसंघही निश्चित करण्यात आला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी त्याला नकार दिला. याबाबत उद्धव ठाकरे यांनी ‘हा सर्वस्वी आदित्य यांचा निर्णय आहे, तेच अंतिम निर्णय घेतील असे सांगितले होते.’ त्यामुळे आता आदित्य काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनची निवडणूक लढवली होती. त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या त्यांच्या खांद्यावर आहे.