Pune: आरोपींच्या गोळीबारात पोलीस पुणे आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

या चकमकीत पुण्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pune Police Commissioner Krishna Prakash) किरकोळ जखमी झाले आहेत.

Krishna Prakash | (Photo Credits: Facebook)

पुणे (Pune) येथे पोलीस आणि सराईत गुन्हेगार यांच्यात पोलीस चकमक झाली. या चकमकीत पुण्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pune Police Commissioner Krishna Prakash) किरकोळ जखमी झाले आहेत. कृष्णप्रकाश (Krishna Prakash) आणि इतर पोलीस अधिकारी आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. या वेळी ही चकमक झाली. आरोपी हे सरईत गुन्हेगार आहेत. गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त अमृतकर यांनी घडल्या घटनेबाबत माहिती दिली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हे (Pune Crime) वाढले आहेत.

पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात गोळ्या झाडून एका तरुणाची भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली होती. योगेश जगताप असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांनाअटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण हे अद्याप फरारच होते. या दोघांचा शोथ घेण्यासाठी अवघे पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. दरम्यान, या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती. (हेही वाचा, Pune Thift: पुण्यामध्ये चोरट्यांनी एटीएममध्ये स्फोट करत 19 लाखांची चोरी, आरोपींचा शोध सुरू)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश जगताप हत्या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार गुंड गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांच्या मागावर पुणे पोलीस होते. दरम्यान, हे तिघेजण रात्री आकराच्या सुमारास चाकण परिसरातील कोये या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, हरीश हे निश्चित ठिकाणी गेले. या वेळी त्यांच्यात आणि आरोपींच्यात चकमक झाली.

आरोपींनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. अखेर आरोपींच्या पिस्तूलातील गोळ्या संपल्या. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि वातावरण शांत होताच दबा धरुण बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला बेड्या ठोकल्या. यात पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश किरकोळ जखमी झाले.