Aaditya Thackeray on Rahul Shewale: आदित्य ठाकरे यांचे राहुल शेवाळे यांना प्रत्युत्तर, 'घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी गद्दारांकडून माझ्यावर खोटे आरोप'

अडचणीत आलेले घटनाबाह्य मुख्यमत्री आणि राज्यपाल यांना वाचविण्यासाठी ते माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. मी त्या घाणीत उतरु इच्छित नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु देत.

Rahul Shewale, Aaditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी संसदेत केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अडचणीत आलेले घटनाबाह्य मुख्यमत्री आणि राज्यपाल यांना वाचविण्यासाठी ते माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत. मी त्या घाणीत उतरु इच्छित नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु देत. ज्यांची आपल्या घरावर निष्टा नसते त्यांच्याकडून दुसरी काय आपेक्षा ठेवणार? आता तर त्यांचे मित्रपक्षच त्यांना अडचणीत आणत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर सुरु असलेली चर्चा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे आदित्य ठाकर म्हणाले.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत ( Sushant Singh Rajput ) प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर 'एयू 'नावाने सेव असलेला फोन क्रमांक हा आदित्य उद्धव ठाकरे यांचा होता. याच फोन क्रमांकावरुन रियाच्या फोनवर 44 फोन कॉल आले होते, असा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळे यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणात बिहार पोलिसांनी आणि सीबीआयने केलेल्या तपासातील माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. ती पुढे यावी अशी मागणीही शेवाळे यांनी आपल्या भाषणात केली. (हेही वाचा, Rahul Shewale on Aaditya Thackeray: 'एयू' म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे, या नावाने रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह प्रकरणात राहुल शेवाळे यांचा आरोप)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एनआयटी भूखंड प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत. राज्यपालांनी सातत्याने विविध वक्तव्यांतून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे विरोधकांनी ही प्रकरणे लावून धरली आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी घाणेरडे मुद्दे पुढे केले जात आहेत, असे आदित्या ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यापालांनी तर महाराष्ट्राचा अपमान करण्याची मालिकाच सुरु ठेवली आहे. सुरुवातीला त्यांनी विधिमंडळात भाषण न करता महाराष्ट्राचा अपमान केला. त्यानंतर त्यांनी महापरुषांचा आणि राज्यातील जनतेचाही अपमान केला. त्यामुळे त्यांना हटवायचे सोडून हे लोक भलतीकडेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.