Devendra Fadnavis On Shiv Sena: एका महिलेला ठाकरे सरकार घाबरले अन् त्यांनी गुंड पाठवले; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

एका महिलेला ठाकरे सरकार इतकं घाबरलं की त्यांनी गुंड पाठवले, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) निशाणा साधला.

Devendra Fadnavis | (Photo Credit -ANI)

Devendra Fadnavis On Shiv Sena: एका महिलेला ठाकरे सरकार इतकं घाबरलं की त्यांनी गुंड पाठवले, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) निशाणा साधला. आज पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही तर मग काय पाकिस्तानात म्हटली जाणार का? एका महिलेला ठाकरे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे,' अशी टीकाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत शनिवार जो प्रकार घडला तो अतिशय लाजीरवाणा होता. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथं येतात. ते पोलिसांना सांगतात की, बाहेर गुंड आहेत. त्यांच्याकडून हल्ला केला जाऊ शकतो. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतचं झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांच या हल्ल्याला समर्थन होतं किंवा त्यांना दबावामुळे काहीच करता आलं नाही, असा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. (हेही वाचा - Sanjay Raut On BJP: शिवसैनिकांच्या स्वभावात आक्रमकता आहे, तुम्ही त्यांना छेडले तर ते तुम्हाला सोडणार नाहीत, संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य)

दरम्यान, शनिवारी घडलेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीचं पाहिजे. अन्यथा राज्यात कुणीही सुरक्षित नाही हे सिद्ध होईल. जर झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीला पोलीस सुरक्षित बाहेर काढू शकत नाहीत. तर मग अशाप्रकराचं झुंडशाही सरकार मी पाहिलेलं नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे. या प्रकरणी गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे आम्ही कठोर कारवाईची मागणी केली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

शनिवारी घडलेल्या सर्व प्रकारामुळे आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.