Nandurbar Accident: नंदुरबार येथील तोरणमाळ घाटात भीषण अपघात; जीप दरीत कोसळल्याने 6 मजुरांचा मृत्यू

या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Accident (Photo Credit: Twitter)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मंजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील तोरणमाळ घाटातील (Toranmal Ghat) खडकी पॉईंटजवळ आज (23 जानेवारी) सकाळी घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमीं झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मजूर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातील रहिवाशी आहेत. या घटनेतील मजूर आज सकाळी नियमितपणे एका जीपमधून तोरणमाळ येथे कामाला जात होते. मात्र, तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला. त्यानंतर जीप 70-80 फूट खोल दरीत कोसळली. ज्यात 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. हे देखील वाचा- Thane Fire: ठाणे शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला आग

या अपघाताची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. या अपघात जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, घटनास्थळी म्हसावाद पोलिसांचे पथक दाखल झाले असून याप्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या अपघातात इतका भयंकर होता की, यात जीपचा फक्त सांगडाच उरला आहे.