धक्कादायक! पुण्याच्या प्रसिद्ध एसपीज बिर्याणीमध्ये सापडल्या अळ्या; मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरे (Video)

इथे सिह्गड रोड वर राहणारे वीरेंद्र ठाकूर, दुपारी 12 वाजता त्यांच्या मुलासह जेवणासाठी गेले होते. जेवताना त्यांच्या मुलाच्या ताटात त्यांना अळ्या आढळल्या

संग्रहित संपादित प्रतिमा (Photo Crdit : Youtube)

एफडीए (FDA) ने कडक नियम घालून दिल्यानंतरही पुण्यात (Pune) ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा धोका उपहारगृह पत्करत आहेत. नुकतेच लोकप्रिय जहांगीर हॉस्पिटलमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे सूप मध्ये आढळले होते. त्यानंतर बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले होते. आता असाच एक प्रकार घडला आहे पुण्याच्या प्रसिद्ध एसपी बिर्याणी (Sp's Biryani) येथे. इथल्या उपहारगृहातील बिर्याणी मध्ये ग्राहकाला अळ्या सापडल्या आहेत. वीरेंद्र ठाकुर यांना या अळ्या सापडल्या आहेत, याबाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पुण्याच्या टिळक रोडवर, एस पी कॉलेज समोर लोकप्रिय एसपीज बिर्याणी हाउस आहे. इथे सिह्गड रोड वर राहणारे वीरेंद्र ठाकूर, दुपारी 12 वाजता त्यांच्या मुलासह जेवणासाठी गेले होते. जेवताना त्यांच्या मुलाच्या ताटात त्यांना अळ्या आढळल्या, त्यांनी लगेच या बाबतचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी ही गोष्ट कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून दिली, त्याने उर्मटपणे मग काय झाले असे विचारले. त्यानंतर त्यांनी त्याला मालकाला बोलावून आणण्यास सांगितले, त्यावर जी व्यक्ती समोर आली तिनेही उडवा उडवीची उत्तरे दिली. यावर ठाकूर चिडले असता, त्या व्यक्तीने त्यांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: जहांगीर हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे गोळे; FDA ने ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड)

या घटनेबाबत हॉटेल व्यवस्थापकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. या सर्व प्रकारानंतर ठाकुर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. एसपी बिर्याणी हे फार लोकप्रिय उपहारगृह आहे, इथे नेहमीच लोकांचा राबता असतो. मात्र अशाप्रकारे अन्नात अळ्या सापडल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.