ट्विटरवर केली आत्महत्येच्या शिक्षेबाबत विचारणा; मुंबई पोलिसांनी सोशल मिडियाद्वारे मदतीचा हात देऊन वाचवले प्राण
सध्या सोशल मिडियावर मुंबई पोलिसांच्या या कृत्याची प्रचंड प्रशंसा होत आहे
मुंबई पोलिस (Mumbai Police) हे किती कर्तव्यदक्ष आहेत, जनतेच्या मदतीला किती तत्परतेने धावून येतात याची अनेक उदाहरणे आपण पहिली असतील. आज पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रत्यय आला. आज मुंबई पोलिसांच्या त्वरित प्रतिसादामुळे एका आत्महत्या (Suicide) करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले. सध्या सोशल मिडियावर मुंबई पोलिसांच्या या कृत्याची प्रचंड प्रशंसा होत आहे. तर, रविवारी निलेश बेडेकर नावाच्या व्यक्तीने एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने आत्महत्या केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास होणाऱ्या शिक्षेबद्दल माहिती विचारली होती.
ही माहिती त्याने मुंबई पोलिसांना उद्देशून विचारली होती. आपल्या ट्विटमध्ये त्याने मुंबई पोलिसांना टॅग केले होते. त्यानंतर ट्विटरच्याच माध्यमातून पोलिस या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.
रविवारी दुपारी निलेश बेडेकर यांनी केलेले ट्विट:
'मी आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे, त्यासाठी मला काय शिक्षा होईल हे मला जाणून घ्यायचे होते. मी विकिपीडिया आणि गुगलवरही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केले मात्र काही माहिती मिळाली नाही.'
त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर दिले:
'हॅलो निलेश, समस्या ह्या आयुष्याचा भाग आहेत. मात्र त्यामुळे एक इतके मोठे पाऊल उचलणे योग्य नाही. कृपया यामध्ये वनराई पोलिस कर्मचार्यांना हस्तक्षेप करण्याची आणि तुम्हाला आवश्यक ती मदत पुरवण्याची परवानगी मिळावी अशी आमची विनंती आहे.' त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनीही ट्विट करत 'आम्ही काय मदत करू शकतो अशी विचारणा केली' (हेही वाचा: Friendship Day च्या दिवशी पावसात अडकलेल्या जनतेला मुंबई पोलिसांचा आधार, मित्र बनून पुढे केला मदतीचा हात)
तोपर्यंत ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर अनेक वापरकर्त्यांनीदेखील कमेंट करून निलेश यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निलेशने आपला नंबर व पत्ता शेअर केला व लगेच पोलिस तिथे पोहोचले. त्यानंतर निलेश यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर बर्याच सल्लागारांनी मदतीचा हात पुढे केला.