Pune Shocker: धक्कादायक! कौटुंबिक वादातून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने केली आत्महत्या; घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त

डॉ. दिवेकर हे पशुवैद्यकीय तज्ञ होते तर त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका होती.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune Shocker: कौटुंबिक वादातून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात उघडकीस आली आहे. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42), पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), आदिवत अतुल दिवेकर (वय 9), वेदांती अतुल दिवेकर (वय 6) अशी मृतांची नावे आहेत.

दौंडच्या वरवंड येथील चैत्राली पार्क सोसायटीत अतुल दिवेकर आणि त्यांचे कुटुंब राहत होते. डॉ. दिवेकर हे पशुवैद्यकीय तज्ञ होते तर त्यांची पत्नी पल्लवी एका शाळेत शिक्षिका होती. (हेही वाचा -Saroj Kamble Death Case: सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळे यांच्या मृत्यूचे गूढ उकलले, मुलगा इनायत परदेशी हाच मारेकरी असल्याचे उघड)

दिवेकर कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा मंगळवारी दिवसभर बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता त्यांना आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता, त्यांना डॉ. दिवेकर हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. तर त्यांची पत्नीदेखील मृतावस्थेत पडलेली दिसली.

स्थानिकांनी या घटनेची माहिती दौंड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून डॉ. दिवेकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'मी आत्महत्या करत आहे असून मी माझी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली आहे. मुलांचे मृतदेह शेजारच्या विहिरीत टाकले आहेत.' दरम्यान, चैत्राली पार्क येथील विहिरीवर पोलिसांचे पथक दाखल झाले असून मुलांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.