Maharashtra: जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल; तक्रारदाराने केले गंभीर आरोप
बुधवारी रात्री उशिरा आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
Maharashtra: मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी एका शिक्षिकेच्या तक्रारीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत फोर्टच्या महाराष्ट्र माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (Maharashtra Secondary Training College, Fort) प्रभारी प्राचार्या उर्मिला परळीकर (Urmila Paralikar) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. बुधवारी रात्री उशिरा आझाद मैदान पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
तक्रारदार महिला ही पालघरच्या तलासरी तालुक्यातील खांडीपारा या गावात शिक्षिका आहे. सुमित्रा मंगत अस या तक्रारदार महिलेचं नाव आहे. सुमित्रा यांनी सांगितलं की, “माझ्या बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून परळीकर मॅडमने मला माझ्या मूळगावाबद्दल विचारले. त्यानंतर त्यांनी मला मी आदिवासी आहे का? असं विचारलं. त्यांनी मला माझ्या गावातील शाळेतील शिक्षक असेचं बोलतात का? तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनाही आदिवासी भाषेत शिकवणार का? असे अनेक प्रश्न विचारले.'' सुमित्रा मंगत पुढे म्हणाल्या की, त्यांनी माझ्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांवर जातीवाचक टीका केली आहे. हे विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातील आहेत. (हेही वाचा - Sameer Wankhede Death Threats: एनसीबी मुंबई चे माजी संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी; गोरेगाव पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल)
दरम्यान, अक्षदा मालेकर या विद्यार्थिनीने सांगितले की, "शिक्षक आम्हाला ओढणी न घालण्यामागील आमचा हेतू काय? असा प्रश्न करून आमच्या पेहरावावर भाष्य करत आहेत. असं करून मुलांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे का? असा प्रश्नही शिक्षक आम्हाला विचारत आहेत.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी COPS विद्यार्थी संघटना आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांना पत्रे लिहिली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. या सर्व प्रकारानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. आझाद मैदानाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भूषण बेळणेकर म्हणाले, "आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्ही जबाब घेऊन तपास करत आहोत."
डॉ. परळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी सरकारी प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण संचालक धनराज माने प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नव्हते. एनएसयूआयचे राज्य उपाध्यक्ष फैसल शेख म्हणाले, शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दरम्यान, परळीकर यांना यापूर्वी माजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून मुख्याध्यापक पदावरून काढून टाकण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून मानसिक छळ झाल्याची लेखी तक्रार दिली होती. परंतु, तरीही अवघ्या तीन महिन्यांनंतर त्यांना पुन्हा मुख्याध्यापकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.