94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आनंद
94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली.
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) नाशिकला (Nashik) मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज (शुक्रवार, 8 जानेवारी) औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संमलेनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्या ठरल्यानंतर जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
यंदा 94 व्या साहित्य संमेलनासाठी एकूण 5 निमंत्रणं आली होती. त्यात नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरचे एक या निमंत्रणांचा समावेश होता. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर नियंत्रणही पाठवले होते आणि दिल्लीत संमेलन करण्याची मागणी केली होती. मात्र साहित्य महामंडळच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एका संस्थेला पाहणीसाठी निवडले. पाहणी केली आणि अहवाल महामंडळाकडे सादर केला. त्यामुळे स्थळनिवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारुन 94 वे साहित्य संमेलन तेथे करण्याचे निश्चित केले, असे ठाले पाटील यांनी सांगितले.
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी 24 जानेवारी रोजी समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात येईल. तसंच कार्यक्रम पत्रिका देखील या बैठकीत ठरवण्यात येईल, असे ठाले यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे साहित्य महामंडळाचे कार्यक्रम, उपक्रम बंद होते. परंतु, आता राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्याने साहित्य मंडळाने कामाला सुरुवात केली आहे. (93 व्या साहित्य संमेलनात धार्मिक वाद; ना.धो. महानोर यांना उद्घाटनाला उपस्थित न राहण्याचा इशारा)
दरम्यान, साहित्य संमेलन नाशिकला होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहे. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसंच संमेलनास पूर्णत: मदत करण्याची आणि साहित्यिकांचा योग्य असा मान सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, 93 वं मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडलं होतं. यासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद येथून निमंत्रण आले होते.