मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसचे 9 रुग्ण आढळले; राज्यातील एकूण Coronavirus रुग्णांची संख्या 153 वर
आता भारतही या संकटाचा सामना करत असलेला दिसत आहे
अमेरिका, इटली, चीन यांसारख्या देशांची आरोग्यसेवा अतिशय उत्तम असूनही, या देशांचा कोरोना व्हायरस (Coronavirus) समोर टिकाव लागला नाही. आता भारतही या संकटाचा सामना करत असलेला दिसत आहे. भारतात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे मात्र तरी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसचे आणखी 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 जणांनी परदेश प्रवास केला होता. इतर 4 जण हे या 5 जणांच्या संपर्कात आल्याने त्यांना या विषाणूची लागण झाली. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली आहे.
एएनआय ट्वीट -
आज मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमधील 6 लोक हे शहरातील आहेत तर इतर 3 मुंबई बाहेरील आहेत. या 9 प्रकरणांसह मुंबईमधील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 86 झाली आहे. महाराष्ट्रात सांगली येथे कोरोनाचे तब्बल 23 रुग्ण आढळल्याने राज्यातील बाधित लोकांची संख्या वाढली आहे. इस्लामपुरात जे 12 नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या 4 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील लोक आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. (हेही वाचा: मुंबई: कोरोना विषाणूमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठा फटका; 6 दिवसांत तब्बल 135 कोटींचे नुकसान)
दरम्यान, सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. लॉक डाऊन असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक महत्वाची आढावा बैठक पार पडली. नागरिकांकडून जर का नियमांचे पालन झाले नाही तर, सैन्य दलाला पाचारण केले जाईल असेल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.