धक्कादायक! 'तुम्हें सबकुछ आता है' असं म्हणत आठवीत शिकणा-या हुशार विद्यार्थ्याला 7 वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण; अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beat Representative Image (फाईल फोटो)

आपल्यासमोर कुणा हुशार विद्यार्थ्याचे कौतुक केले किंवा त्याची उदाहरण दिले तर अनेक विद्यार्थ्यांची आग तळपायात जाते. खरे पाहता ते एका अर्थी बरोबरसुद्धा आहे. तो बघ किती हुशार आणि तू बघ कसा मठ्ठ अशी दूषणं लावली जातात. अशा वेळी आपण मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करतोय हे कित्येकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. अशा वेळी जशी पालक आपल्या मुलांना उदाहरणं देतात तशीच उदाहरणं कित्येक शाळेतील शिक्षक देखील देतात. याच दूषणांपायी पुण्यातील एका इंग्रजी शाळेतील आठवीत शिकणा-या 7 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमधील सय्यदनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली मात्र शाळेने योग्य ती कारवाई न केल्याने त्याच्या वडिलांनी वानवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेदेखील वाचा- मे महिन्यात होणाऱ्या देशाच्या जनगणनेसाठी शिक्षकांच्या सुट्ट्या होणार रद्द

ही सर्व मुले साधारण 15 वयोगटातील आहे. पीडित मुलगा हा त्यांच्याच वर्गात आठवीत इयत्तेत शिकत होता. तो खूप हुशार होता आणि वर्गात प्रश्नांची उत्तरे पटापट द्यायचा. त्यामुळे शाळेतील शिक्षक इतर मुलांना त्याचे उदाहरण द्यायचे. हाच राग मनात ठेवून या मुलांनी त्यांना घेरले आणि "तुम्हे सबकुछ आता है, तू हर सवाल का जवाब देता है इसलिए टिचर हमे डाटते है" असे म्हणून त्यांनी त्याला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे शाळेच्या कारवाईने समाधान न झाल्याने या मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.