Mumbai: परदेशातून आलेल्या महिलेने पोटात लपवून आणले 5 कोटींचे कोकेन असलेल्या 80 कॅप्सूल्स, मुंबई विमानतळावर झाली अटक

यात महिलेने आपल्या पोटात 5 कोटींचे कोकेन असलेली कॅप्सूल गिळल्याचे उघडकीस आले आहे.

Drugs Representative Image (Photo Credits: PixaBay)

वेनेजुएलाची नागरिक असलेल्या एका धूर्त महिलेने चक्क आपल्या पोटात 800 ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji International Airport) उघडकीस आला आहे. यात महिलेने आपल्या पोटात 5 कोटींचे कोकेन असलेली कॅप्सूल गिळल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या या महिलेवर तेथील पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्या महिलेला जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्या वैद्यकिय चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी एक्स रे मध्ये तिच्या पोटात कॅप्सूल असल्याचे आढळले. हेही वाचा- दिल्ली: 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या हेरॉईनची रिकाम्या असलेल्या पोत्यांमधून तस्करी, पोलीस चक्रावले

डॉक्टरांनी याबाबत माहिती देताच, महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तिच्या एका नायझेरियन मित्राकडून तिला हे कोकेन विकण्यासाठी देण्यात आले होते. केवळ पैशांसाठी या महिलेने 800 ग्रॅम वजनाच्या 80 कॅप्सूल्स गिळल्या.

दरम्यान, तिच्याकडून 796 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 4 कोटी 77 लाख इतकी आहे. त्याला न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याआधीच अशीच एक घटना केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कर्नाटकची राजधानी बंगळूरू (Bengaluru) येथे एका महिलेला चक्क सॅनिटरी पॅडमधून (Sanitary Pads) ड्रग्ज (Drugs) लपवून घेऊन जात असताना पकडले होते. ही महिला बंगळूरूवरून दोहाला जाण्याची तयारीत असताना, या ड्रग्जची तस्करी करताना ताब्यात घेतले. केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kempegowda International Airport) च्या पार्किंग लॉट येथे ही महिला ड्रग्जसह पोलीसांना सापडली.