मुंबई: धारावी मध्ये 4 नवे COVID-19 रुग्ण, या परिसरातील कोरोना बाधितांची संख्या 47 वर

तसेच या परिसरात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून या परिसरातील मृतांची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे.

Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus) हा विषाणू झपाट्याने पसरत चालला असून मुंबईत कोरोना बाधितांची संख्या देखील वाढतच चालली आहे. यात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या मुंबईतील धारावी परिसरात आज 4 नवे रुग्ण आढळले असून धारावीत (Dharavi) कोरोना बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. तसेच या परिसरात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून या परिसरातील मृतांची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून याचा गंभीर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1399 वर पोहचला असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई तसेच उपनगरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेदेखील वाचा- मुंबई: लालबाग मधील गणेश गल्ली परिसर 'Containment Area' म्हणून BMC ने केला घोषित

तर महाराष्ट्रात काल 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली आहे. यापैकी 217 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

याशिवाय देशात आज 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 8,447 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 273 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.