कोल्हापूर: रक्षाविसर्जन कार्यक्रमात जेवण केलेल्या 37 लोकांना विषबाधा

रक्षाविसर्जन कार्यक्रमात नातेवाईक आणि भावकी मंडळींना देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangale) तालुक्यामधील पाडळी मानेवाडीत रक्षाविसर्जन कार्यक्रमात (Raksha Visarjan Program) दिलेल्या अन्नामुळे 37 जणांना विषबाधा (Food  Poisoning) झाली आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रमात नातेवाईक आणि भावकी मंडळींना देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद वडगाव पोलिसांनी घेतली असून याबाबत अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

हातकणंगले मधील पाडळी येथील मानेवाडी या गावामध्ये अवधूत रामचंद्र पाटील यांचे आजोबा दत्तात्रय पाटील यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. यावेळी सकाळी आणि रात्री नातेवाईक, शेजारी तसेच भावकी यांनी आणलेले जेवण एकत्र करून सर्व लोकांना जेवायला वाढण्यात आले होते. बुधवारी सुमारे 60 जणांनी हे जेवण घेतले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे यातील काही जणांना पोटदुखी, जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले. या रुग्णांना तात्काळ नवे पारगावच्या ग्रामीण रूग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा - औरंगाबाद: देवदर्शन करून येत असताना क्रूझर कारच्या भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू)

27 डिसेंबर 2019 रोजी वाशिम जिल्ह्यात तेरवीच्या कार्यक्रमासाठी जेवण करावयास गेलेल्या 35 जणांना जेवणातून विषबाधा झाली होती. यात एकाचा मृत्यूही झाला होता. जेवण घेतल्यानंतर काहींना उलटी मळमळ तर काहींना चक्कर यायला लागले होते. त्यामुळे या सर्वांना तात्काळ वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते.