Bhandara: भंडारा जिल्ह्यामधील आश्रमशाळेतील 30 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

आरोग्य विभागाने अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, असे सोमकुवार यांनी सांगितले. आश्रम शाळा या निवासी शाळा आहेत ज्यात आदिवासी समाजातील मुलांना माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण दिले जाते.

Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bhandara: भंडारा येथील शाळेत अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याने 30 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्व महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली. तुमसर शहरातील येरळी आश्रमशाळेत गुरुवारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

पीटीआयशी बोलताना भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवार म्हणाले, गुरुवारी आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांनी उलट्या, पोटदुखी आणि तापाची तक्रार केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या 325 विद्यार्थ्यांची तपासणी केली. (हेही वाचा - Engineering Student Committed Suicide: परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा)

त्यापैकी 30 विद्यार्थ्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थी वसतिगृहात दिलेले अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडल्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा आम्हाला संशय आहे, असं सोमकुवार यांनी सांगितलं.

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल. आरोग्य विभागाने अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, असे सोमकुवार यांनी सांगितले. आश्रम शाळा या निवासी शाळा आहेत ज्यात आदिवासी समाजातील मुलांना माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण दिले जाते.