आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची 30% पगारकपात; लातूर जिल्हा परिषदेचा अनोखा निर्णय
अलिकडच्या काळात आई-वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर लातूर जिल्हा परिषदेने तोडगा काढला आहे.
वृद्धपकाळात आई-वडीलांचा सांभाळ न करणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. अलिकडच्या काळात आई-वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर लातूर जिल्हा परिषदेने (Latur Zilla Parishad) तोडगा काढला आहे. वृद्ध आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्याची 30% पगारकपात करुन ती रक्कम आई-वडीलांना देण्यात येणार आहे. ही रक्कम आई-वडीलांच्या खात्यात जमा होणार आहे. हा अनोखा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. लातून जिल्हा परिषदेच्या एकूण 14 विभागात जवळपास साडेबारा हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषदेने असा ठराव मंजूर केल्यावर हा महत्त्वपूर्ण मुद्दा मंचकराव पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्वरित सहमती दिली. दरम्यान, याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात यावा असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी म्हटले आहे. तसंच कायद्यात तसा अधिकार असल्याने तसा ठराव मंजूर होऊ शकतो. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
AIR News Mumbai Tweet:
आई-वडीलांच्या तब्येतीची कारणं देऊन अनेक शिक्षक बदली आणि रजेसाठी अर्ज करतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचा सांभाळ करत नाहीत. दरम्यान, हा नियम केवळ शिक्षकांनाच नाही तर इतर कर्मचाऱ्यांनही लागू करता येईल का याची माहिती घेण्यास अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निर्णयामुळे वृद्धवयात आई-वडीलांची होणारी पिळवणूक, त्रास अशा घटनांना चाप बसेल, अशी आशा आहे.
मोठ्या कष्टाने आई-वडील आपल्या मुलांना वाढवतात. वृद्धापकाळात शरीर थकल्यामुळे, उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे, मन खचल्यामुळे त्यांना मुलांच्या मदतीची गरज असते. ही मदत आर्थिक, मानसिक, शारीरिक स्वरुपात असते. अशावेळी मुलांनी त्यांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.