मुंबई: मरोळ येथील Woodland Crest सोसायटीत बिबट्या शिरल्याने खळबळ (Watch Video)

अंधेरी भागातील मरोळ परिसरातील विजय नगर जवळील वूडलँड क्रिस्ट सोसायटीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leopard was spotted by residents at Woodland Crest Marol (Photo Credits: File Photo)

मुंबईत पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अंधेरी (Andheri) भागातील मरोळ (Marol) परिसरातील विजय नगर जवळील वूडलँड क्रेस्ट (Woodland Crest) सोसायटीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी मोठीशी मांजर गाडीखाली झोपल्याचे स्थानिकांना आढळून आले. पण ती मांजर नसून बिबट्या होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वूडलँड सोसायटीतील रहिवाशी प्रमोद शर्मा यांनी पार्क केलेल्या सफेद रंगाच्या इनोव्हा कारखाली बिबट्या बसल्याचे पाहिले आणि त्यांनी वन अधिकाऱ्यांना पाचारण केले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आरे मिल्क कॉलनीच्या सुरक्षा भितींपासून ही सोसायटी 100 मीटरच्या अंतरावर आहे.

ANI ट्विट:

पहा व्हिडिओ:

काही वर्षांपूर्वी अशाच एका बिबट्याने मरोळ परिसरात दहशत पसरवल्याची माहिती Plant and Animals Welfare Society चे कार्यकर्ता सुनिश सुब्रमण्यम यांनी दिली.

अलिकडच्या काळात बिबट्या रहिवासी वसाहतीत, गर्दीच्या ठिकाणी घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. आरे कॉलनी आणि संजय गांधी नॅशनल पार्क जवळच असल्याने अंधेरी, गोरेगाव आणि ठाणे शहरात अशा घटना वारंवार समोर येतात. फेब्रुवारी महिन्यात ठाण्यातील कोरम मॉल, सत्कार हॉटेलमध्ये बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर सहा तासांच्या सर्च ऑपरेशननंतर बिबट्याला पकड्यात यश आले होते.