लज्जास्पद! जळगाव मधील महाविद्यालयात 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन केली रॅगिंग

या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. एका पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला.

Ragging (Photo Credits: Representative Photo)

महाविद्यालयात चालणारी रॅगिंग (Ragging) थांबवण्यासाठी दिवसेंदिवस कायदा कडक होत असला तरीही राज्याच्या कित्येक भागात हा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. असाच रॅगिंगचा एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील इकरा युनानी महाविद्यालयात 28 ज्युनियर विद्यार्थ्यांना विवस्त्र करुन त्यांची रॅगिंग करण्यात आली. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी पहाटे दोन वाजता महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. एका पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरुन हा प्रकार उघडकीस आला.

घटना रविवारी (12 ऑक्टोबर) ला मध्यरात्री घडली. महाविद्यालयात आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंग करण्याच्या बहाण्याने या महाविद्यालयातील 15 ते 20 सीनियर विद्यार्थ्यांनी 28 नवीन विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर त्यांना विवस्त्र करुन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध करणा-या यातील काही नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सीनिअर्सने शिवीगाळ करत मारहाण देखील केली. त्यातील एकाने तेथून पळ काढत सुरक्षारक्षकांची भेट घेतली व घडलेला प्रकार आपल्या पालकांना फोन करुन कळवला.

हेदेखील वाचा- Nair Hospital Dr. Payal Tadvi Suicide Case: 'मार्ड' च्या कारवाईनंतर नायर हॉस्पिटलच्या प्रसुती विभाग प्रमुख सह 4 डॉक्टर्सचं निलंबन

त्याच्या पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख हे महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुदस्सरचे पालक महाविद्यालयात दाखल झाले होते. महाविद्यालय प्रशासनाने पालकांसमोर घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित केले.