Gatari Amavasya 2019: गटारीच्या निमित्त 250 टन चिकनवर ताव मारण्याचा पुणेकरांचा बेत
मंगळवारी दिवसभरात 200 ते 250 टन चिकन, एक टन मटण आणि सुमारे एक ते दीड टन मासळी पुणेकरांनी खरेदी केली आहे.
गटारी (Gatari) म्हणजे मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय. पुढील दीड-दोन महिने नॉनव्हेज खाता येणार नाही म्हणून गटारी म्हणजे नुसताच चिकन, मटणावर ताव मारणे, मनसोक्त मासे खाणे. ही गटारी साजरी करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे मंगळवारी संध्याकाळपासून चिकन (Chicken),मटन (Mutton) शॉप बाहेर लोकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईकरांसोबत आता पुणेकरही गटारीच्या बाबतीत आग्रही पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात 200 ते 250 टन चिकन, एक टन मटण आणि सुमारे एक ते दीड टन मासळी पुणेकरांनी खरेदी केली आहे.
आखाडातील (गटारी) रविवारी मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. मात्र, रविवारी एकादशी होती. त्यामुळे अनेकांनी आखाड पार्टीचा बेत पुढे ढकलला. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आज, बुधवारी आहे. त्यामुळे मंगळवारपासून पुणेकरांनी चिकन, मटणासह मासळी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळाले. चिकन, मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लागल्याचे चित्र दिसले.
नागरिकांसोबत आज हॉटेल, केटरिंग व्यावसायिकांनी देखील बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र सततच्या पावसामुळे यंदा चिकन, मटणाच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
'मंगळवारी दिवसभरात 200 ते 250 टन एवढी चिकनची विक्री झाली. बुधवारी 400 ते 500 टनापर्यंत विक्री होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या आखाडानिमित्त झालेल्या खरेदी विक्रीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 10 ते 15 टक्के चिकनची विक्री घटली आहे,' अशी माहिती चिकनचे व्यापारी रूपेश परदेशी यांनी मटा शी बोलताना दिली.