Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 2259 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 90,787 वर
आता राज्यात रोज 2 हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे.
बघता बघता देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाखाच्या वर गेली, त्याचसोबत महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वी अधिकृत कोरोना विषाणू रुग्णसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले. आता राज्यात रोज 2 हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात आज 2259 कोरोना बाधीत रुग्णांची व 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णसंख्या 90787 वर पोहोचली आहे. दिलासादायक म्हणजे, आज नवीन 1663 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत व आतापर्यंत एकूण 42,638 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
सध्या राज्यात एकूण 44,849 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईनंतर रुग्ण संख्येमध्ये पुण्याचा नंबर लागतो. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 200, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सध्या पुणे विभागातील 7,896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12,662 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4,171 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. लॉक डाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे, सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी निशुल्क ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, या सेवेचा महिन्याभरात 1403 रुग्णांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, कालच्या अपडेटनुसार राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 46.28 टक्के एवढा आहे, म्हणजे जवळजवळ 50 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.