Bhandara Crime: भंडाऱ्यात टोलक्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून हल्लेखोरांना बेदम चोप
टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.
भंडाऱ्यात टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा मृत्यू (Murder) झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करत त्यांना पकडलं आणि बेदम चोप दिला. यात एक आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेही मृताच्या मित्रांनी आरोपींना पुन्हा जबर मारहाण ही करण्यात आली. भंडारा (Bhandara) शहरातील गांधी चौकात रात्रीच्या सुमारास घडली.
अमन नांदुरकर (वय 22 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव असून तो लस्सी विक्रेता होता. टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंतर्गत वादामुळे ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करुन त्यांना पकडून चांगलाच चोप दिला. नागरिकांच्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून त्यातील अभिषेक साठवणे हा आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी नागपुरला हलवण्यात आले आहे.
दरम्यान अमनच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत तिथे उपचारासाठी दाखल आरोपींना पकडून मारहाण केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांसह राज्य राखीव दलाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.