Mumbai Shocker: चेंबूरमधील बीएआरसी क्वार्टरमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; दोघांना अटक
पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहणारी पीडित मुलगी BARC मध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांकडे जात होती.
Mumbai Shocker: चेंबूरमधील (Chembur) पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) येथील एका फ्लॅटमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15-16 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 12.30 च्या दरम्यान घडली. पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहणारी पीडित मुलगी BARC मध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांकडे जात होती. जवळपास वर्षभरापूर्वी तिच्या वडिलांना माँ म्युनिसिपल हॉस्पिटलसमोर असलेल्या कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत फ्लॅट देण्यात आला होता. पहिला आरोपी अजितकुमार यादव (वय, 26) हा जवळच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याचे वडील देखील BARC कर्मचारी आहेत.
अजितकुमार यादव आणि पीडिता एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण घटनेच्या दिवशी यादवने त्याचा मित्र प्रभाकर यादव (वय, 30) याला त्याच्या घरी बोलावले होते. अजित यादव यांचे कुटुंब बाहेर गेले होते आणि त्यामुळे त्याने मित्राला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. (हेही वाचा - Mobile Game Addiction: मोबाईल आणि ऑनलाईन गेम खेळण्यास रोखले, नैराश्येतून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या)
काही वेळानंतर, पीडित मुलगी अजित यादव यांच्याकडे स्वयंपाकासाठी काही साहित्य घेण्यासाठी आली. त्यानंतर अजितने तिला स्प्राईटची बाटली दिली. त्यानंतर पीडिता बेशुद्ध पडली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 12:30 च्या सुमारास जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला समजले की तिच्यावर बलात्कार झाला आहे. नंतर पीडितेने इमारतीत राहणाऱ्या तिच्या काही जवळच्या मित्रांना या क्रूर घटनेची माहिती दिली.
दरम्यान, पीडितेने 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांत याप्रकरणी फिर्यात दिली. त्यानंतर दोन आरोपींविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी एकाच दिवशी अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या घरातून कोल्ड ड्रिंकचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. पीडितेचा वैद्यकीय तपासणी अहवाल येणे बाकी आहे, जो नंतर पुरावा म्हणून आरोपपत्रात जोडला जाईल, असं एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.