मुंबई मधील 163 स्वयंसेवकांवर AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine चे प्रतिकूल परिणाम नाहीत- BMC
बीएमसीच्या केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये या क्लिनिकल ट्राय्लस गेल्या महिन्यात पार पडल्या.
अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड (Oxford) विकसित कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स मुंबईतील 163 स्वयंसेवकांवर करण्यात आल्या होत्या. बीएमसीच्या (BMC) केईएम (KEM) आणि नायर (Nair) हॉस्पिटलमध्ये या मानवी चाचण्या (Clinical Trials) गेल्या महिन्यात पार पडल्या. दरम्यान, स्वयंसेवकांवर अद्याप या लसीचे विपरित परिणाम दिसून आले नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.
लसीच्या चाचणीसाठी आम्ही दोन रुग्णालयांमधील प्रत्येकी 25 अधिक म्हणजेच 50 स्वयंसेवकांचा समावेश करण्याचा विचार करीत आहोत. 200 स्वयंसेवकांवर ट्रायल्स करण्याची आमची अपेक्षा आहे. परंतु, निष्कर्ष काढण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 163 स्वयंसेवक पुरेसे आहेत, असे तज्ज्ञांचे मत असल्यास आम्ही अधिक उमेदवारांची निवड करणे थांबवू, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही स्वयंसेवकावर लसीचा विपरीत परिणाम झालेला नाही, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ब्राझीलमध्ये ही लस दिलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, देशात या लसीच्या मानवी चाचण्या सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या दुष्परिणामांमुळे स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास प्रत्येक स्वयंसेवकाचा 1 कोटीचा विमा उतरवण्यात आला आहे. त्याचबरोबर लसीमुळे काही प्रतिकूल परिणाम उद्भवल्यास प्रत्येक स्वयंसेवकाचे 50 लाखांचे मेडिकल इन्शोरन्स आहे. दरम्यान, ही लस चांगली रोगप्रतिकारकशक्ती प्रदान करते. या लसीमुळे 14 दिवसांत T-cell उत्तेजित होतात. तर 28 दिवसांत अँडीबॉडीज निर्माण होतात.
कोविड-19 चे पॅथोजेन आहेत की नाही हे तपासण्यासाठी लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाची RT-PCR चाचणी केली जाते. पूर्वी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी rapid antibody testing केले जाते. चाचण्यांमध्ये सहभागी झालेले बहुतांश स्वयंसेवक हे 20-45 वयोगटातील आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात युके मधील स्वयंसेवकांवर या लसीचे विपरित परिणाम दिसल्याचे या लसीच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर भारतातही या लसीची चाचण्या थांबवण्यात आल्या. युकेमध्ये चाचण्यांना सुरुवात होताच भारतातही चाचण्या सुरु करण्यास ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने सीरम इंस्टिट्यूडला परवानगी दिली. सध्या कोविडशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत.