महाराष्ट्रातील 150 गावांची Madhya Pradesh मध्ये समाविष्ट होण्याची इच्छा; सीमेवर केली निदर्शने, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

या मागणीसाठी 63 ग्रामपंचायतीतील जनता एकजूट असल्याचे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल रामप्रसाद पाल यांनी सांगितले.

धारणी ग्रामस्त (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील काही लोकांनी आता मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) राहण्याची मागणी करत आहे. मध्य प्रदेशातील विकासकामे आणि वाढत्या पायाभूत सुविधा पाहून लोक या राज्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. लोक महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धारणी (Dharni) तहसील मध्य प्रदेशात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात 29 डिसेंबर रोजी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर 150 गावातील अनेक लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. येथील लोकांनी राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत. धारणी तहसीलचा समावेश मध्य प्रदेशात करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशामध्ये धारणी तहसीलचा समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अमरावती जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल रामप्रसाद पाल यांनी सांगितले की, धारणी तहसील 150 किमी पसरले असून येथील 70 टक्के गावे मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहेत. आरोग्य सुविधांपासून ते रस्त्यांपर्यंत येथील स्थिती अत्यंत बिकट आहे. मार्गांचा 70 किमी पेक्षा जास्त भाग अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी बुरहानपूर, खांडवा, बैतुल येथे जावे लागते. हा तहसील गेल्या 30 वर्षांपासून कुपोषणाशीही झुंज देत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्र सरकार याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याचे आंदोलन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. यासह इथल्या बर्‍याच लोकांची बोलीभाषा हिंदी आहे आणि येथील महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मराठीत बोलतात. भाषेतील फरकामुळे स्थानिक लोक नीट संवाद साधू शकत नाहीत. तसेच येथे योजना खूप उशिरा पोहोचतात, याउलट मध्य प्रदेशात चांगले रस्ते, आरोग्य सेवा, शिक्षण आणि उद्योग आहेत. त्यामुळे लोकांना कामाची योग्य संधी मिळू शकते. (हेही वाचा: 106 शेतकरी कुटुंबांना नवीन वर्षासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर, आमदार महेश लांडगेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

आता, रहिवाशांनी राष्ट्रपतींना निवेदन पाठवून धारणीचा मध्य प्रदेशात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी 63 ग्रामपंचायतीतील जनता एकजूट असल्याचे अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल रामप्रसाद पाल यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.